माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा श्री. एस. राममूर्ती यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये उपस्थितांना आंबा या पिकाचे भारतातील लागवड क्षेत्र तसेच महाराष्ट्रामधील बुलढाणा जिल्ह्यात लागवडीसाठी असलेला वाव यावर चर्चा करून आंबा एक उत्कृष्ट उत्पादन देणारे पीक असून याबाबतीत कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा तसेच विद्यापीठातील शास्त्रज्ञ यांच्याशी संपर्क ठेवून चांगल्या पद्धतीने लागवड करावी आणि फळपिकांना आपले उत्पादन दुप्पट किंवा तिप्पट करण्यासाठी प्राथमिकता द्यावी असे आवाहन केले. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी साहेबांनी जिल्ह्यात आंबा लागवडीस प्राधान्य द्यावे तसेच आंबा प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी महिला बचत गटांनी समोर यावे असे नमूद केले. कृषी विज्ञान केंद्रातील विविध उपक्रमांची माहिती देत शेतकऱ्यांनी सतत कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांना भेट देऊन आपल्या शेतीतील तंत्रज्ञान अद्यावत करून उत्पादकता तसेच उत्पन्न वाढवावे असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जगदीश वाडकर तर आभार प्रदर्शन प्रवीण देशपांडे यांनी केले. एकूण ६१ आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी प्रदर्शनीमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आणि २९ माहितीतील जातींचे आंबे विक्रीस ठेवले आणि महोत्सवास ५७ गावरान जातीच्या आंब्याची नोंद झाली. महोत्सवासाठी जिल्ह्यातून ३४७ शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सहभाग नोंदविला. सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांची मिळून एकूण १२३३ किलो आंब्याची विक्री झाली. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्रातील सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी परिश्रम घेतले. जिल्ह्यातील प्रसार माध्यमांनी कार्यक्रमास प्रसिद्धी दिल्याने शेतकऱ्यांनी तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.