“दामिनी” अॅप देणार विजांची पूर्वसूचना :मनेश यदुलवार, कृषी हवामान तज्ञ, जिल्हा कृषी हवामान केंद्र,कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा. 15.06.2022

महाराष्ट्र राज्यात काही भागात मान्सून पावसाला सुरुवात होऊन महिना झाला आहे. मान्सून सक्रीय होत असताना बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन पावसाने लोणार, मेहकर, बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, खामगाव, मोताळा ई. भागात हजेरी लावलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात वीज पडून जनावरे दगावली आहेत. विजांसह होणाऱ्या पावसाचे पूर्वानुमान शेतकऱ्याला समजावे व जीवितहानी टाळल्या जावी यासाठी पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामान संशोधन संस्था (आय.आय.टी.एम.) यांनी “दामिनी” हे अॅप विकसित केले आहे. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा वीज पडून अनेकांचा मृत्यू होतो व जीवितहानी होते. हे सर्व टाळणे हा दामिनी अॅप विकसित करण्यामागील मुख्य उद्देश आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग व राज्यातील कृषी विद्यापीठे यांचा या अॅपच्या प्रसिद्धी व विस्तारीकरणात मोलाचा वाटा आहे.

दामिनी अॅपसाठी भारतीय उष्णप्रदेशीय हवामान संशोधन संस्था (आय.आय.टी.एम.) यांनी लायटनिंग लोकेशन मॉडेल विकसित करून ठिकठिकाणी माहिती संकलित करण्यासाठी व अद्ययावत सूचना देण्यासाठी सेन्सर बसविले आहेत. विजेसंबंधी शास्त्रीय माहिती, वीज पडणार असल्यास नागरिकांनी/शेतकऱ्यांनी घ्यावयाची दक्षता,वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटाचा अचूक अंदाज ई.ची माहिती दामिनी अॅपमध्ये आहे. स्मार्ट फोन/ अॅंड्रॉईड मोबाईल धारकांनी (शेतकऱ्यांनी/नागरिकांनी) गुगल प्ले स्टोअर मधून हे अॅप डाऊनलोड करून शेतकऱ्यांनी/नागरिकांनी आपले लोकेशन टाकल्यावर आपणास विजेसंबंधी पूर्वसूचना व इतर माहिती मिळणार आहे. म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सदर अॅप डाऊनलोड करून त्याचा लाभ घ्यावा व जीवितहानी टाळावी असे आवाहन मनेश यदुलवार, (कृषी हवामान तज्ञ) व अनिल जाधव (कृषी हवामान निरीक्षक) जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा (डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला) यांनी केले आहे.

 

Author: kvk-buldhana

Leave a Reply

Your email address will not be published.