कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ ते ६ जुलै २०२६ या कालावधीत कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा यांच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी कृषी सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. कृषी सप्ताहाची सुरुवात दि. १ जुलै २०२६ रोजी मौजे सव, ता. बुलढाणा येथे शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमाने झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. अमोल झापे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी डॉ. जगदीश वाडकर, कृषी विभाग व आत्मा विभागाचे अधिकारी तसेच गावातील सरपंच व प्रगतिशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, शाश्वत शेती व कृषी विकासाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.याच दिवशी बोरगाव वसू येथे राज्य कृषीदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) आणि डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती उपक्रम व वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थी, शेतकरी व ग्रामस्थांनी पर्यावरण संवर्धन, शाश्वत शेती आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचा संकल्प केला.
दि. ३ जुलै २०२६ रोजी मौजे कुंबेफळ, ता. सिंदखेड राजा येथे कृषी सप्ताहानिमित्त शेतकरी मार्गदर्शन व बांधावर भेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी डॉ. गणेश काळुसे, डॉ. अनिल तारू, कृषी विभाग व आत्मा विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पिक व्यवस्थापन, वैज्ञानिक शेती पद्धती आणि शेतीतील नव्या तंत्रज्ञानाविषयी प्रत्यक्ष बांधावर मार्गदर्शन केले.
दि. ४ जुलै २०२६ रोजी मौजे भोसा, ता. सिंदखेड राजा येथे शंखी गोगलगाईच्या प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राची पाहणी करण्यात आली. कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. अनिल तारू व डॉ. गणेश काळुसे यांनी शेतकऱ्यांना बांधावरच शंखी गोगलगाईच्या एकात्मिक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी कृषी विभाग व आत्मा विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते.
दि. ५ जुलै २०२६ रोजी अजीसपुर येथे कृषी महाविद्यालय, अकोला यांच्या RAWE कार्यक्रमांतर्गत कृषी सप्ताहानिमित्त प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. डॉ. सुकेशनी वाणे यांनी आधुनिक कृषी अवजारे, मूलस्थानी जलसंधारण, एल-निनो परिस्थितीतील पीक नियोजन व पीक व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. तसेच श्री जी. जी. इंगळे (BTM-आत्मा) यांनी सेंद्रिय खतांचा वापर व पिकांवरील किडींचे व्यवस्थापन याविषयी शेतकरी व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.
दि. ६ जुलै २०२६ रोजी मौजे सरंबा, ता. देऊळगाव राजा येथे शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमासह वृक्षारोपण करून कृषी सप्ताहाचा समारोप करण्यात आला. डॉ. गणेश काळुसे व डॉ. अनिल तारू यांनी शेतकऱ्यांना सुधारित कृषी तंत्रज्ञान, शाश्वत शेती व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.
दिनांक. ७ जुलै २०२६ रोजी कृषी सप्ताहाच्या समारोपानिमित्त ऋतूध्वज ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., पिंपळगाव सराई येथे कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा यांच्या वतीने शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची ४१ वी सभा आयोजित करण्यात आली. यावेळी डॉ. अमोल झापे, डॉ. आशुतोष लाटकर, डॉ. दिनेश कानावडे, डॉ. अनिल तारू, श्री. राजेंद्र पटोळे (अध्यक्ष, ऋतूध्वज ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लि.), श्री. मोहन जगताप (अध्यक्ष, शेतकरी-शास्त्रज्ञ मंच) व श्री. प्रकाश सपकाळ उपस्थित होते. शेतकऱ्यांना जैविक खतांचा वापर, सोयाबीन व मका पीक व्यवस्थापन तसेच FPO ची कार्यपद्धती व शेतकऱ्यांना होणारे लाभ याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या संपूर्ण कृषी सप्ताहामध्ये आयोजित विविध कार्यक्रमांमुळे शेतकऱ्यांमध्ये वैज्ञानिक शेती, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, एकात्मिक कीड व्यवस्थापन तसेच शाश्वत शेतीबाबत जनजागृती निर्माण झाली. सर्व कार्यक्रमांना कृषी विभाग, आत्मा, ग्रामपंचायत प्रतिनिधी, विद्यार्थी, प्रगतिशील शेतकरी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.




