MANGO FESTIVAL-2026

May 11, 2026

कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणा येथे दि. १४ मे रोजी भव्य आंबा महोत्सव व प्रदर्शनीचे आयोजन

आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन, आंबा विक्रीकरिता दालन उपलब्ध करून देणार

             कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा हे नाविन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञानाचा विस्तार करण्याचे कार्य विविध माध्यमातून आजवर करत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आंबा उत्पादनासाठी वाव मिळावा व आंबा प्रेमींना विविध जातींच्या आंब्याची चव चाखता यावी तसेच जिल्ह्यातील स्थानिक जातिवंत आंब्यांचे संवर्धन व्हावे याकरिता कृषि विज्ञान केंद्र, अजिंठा रोड, बुलढाणा येथे कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणा, कृषि विभाग, बुलढाणा आणि आत्मा, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार  दि. १४ मे २०२६ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ०४.०० वा. पर्यंत एकदिवसीय “भव्य आंबा महोत्सव: आंबा प्रदर्शनी व विक्री” चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्याकडील आंबा प्रदर्शनीमध्ये विनाशुल्क विक्रीकरिता ठेवता येणार आहे.या आंबा महोत्सवाचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी, बुलढाणा डॉ. प्रविणकुमार देवरे यांच्या हस्ते होणार आहे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  डॉ. शरद गडाख, सन्माननीय कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला हे राहणार आहेत. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून डॉ. धनराज उंदिरवाडे, संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. श्यामसुंदर माने, संशोधन संचालक, मा. डॉ. देवानंद पंचभाई, अधिष्ठाता कृषि, डॉ. अरविंद सोनकांबळे, अधिष्ठाता उद्यानविद्या, मा. डॉ. प्रमोद वाकळे, सहयोगी अधिष्ठाता, डॉ. शशांक भराड, प्रमुख, फळशास्त्र विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

               महोत्सवाची ठळक वैशिष्ट्ये : स्थानिक आंबा जातींची ओळख व संवर्धन करिता मार्गदर्शन , आंबा फळाच्या विविध वाणांची प्रदर्शनी व विक्री, आंबा लागवड व व्यवस्थापन, तज्ञाचे मार्गदर्शन आणि आंब्याच्या वाणांची कलम विक्री तसेच आंब्यापासून बनविलेले विविध प्रक्रिया पदार्थ. आपल्या शेतातील गावरान आंबे प्रदर्शनीमध्ये सहभागी घेण्यास आणि आंबे विक्रीला आणणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.

            या महोत्सवाला व प्रदर्शनीला शेतकरी बांधवांनी व जिल्हावासियांनी बहुसंखेने सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री. संतोष डाबरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा आणि डॉ. अमोल झापे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणा यांनी केले आहे.

कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा येथे भव्य आंबा महोत्सव :२०२६ आंबा प्रदर्शनी विक्री उत्साहात संपन्न

                     बुलढाणा जिल्हा फळपिकांमध्ये विविधता असलेला जिल्हा असून त्यामध्ये आंबा पिकाचेसुद्धा मोलाचे स्थान आहे. आधुनिक संकरीत आंबा पिकांच्या वाणांच्या वाढत्या प्रभावामुळे या स्थानिक वाणांचे म्हणजेच गावरान अथवा रायवळ आंब्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. अशा परिस्थितीत या वाणांचे जतन आणि पुढील पिढ्यांपर्यंत संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. स्थानिक आंबा वाणांचे प्रदर्शन, शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद, तांत्रिक मार्गदर्शन, आंबा विक्री, तसेच आंबा संवर्धनाबाबत जनजागृती करण्याकरिता स्थानिक आंब्यांच्या जातींचे ज्यामध्ये काळू, पिवळ्या, शेप्या, भदाद्या, शेंद्र्या, लाल्या, गोट्या, नारळ्या, तेल्या, चपट्या, दगड्या संवर्धनाकरिता  कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा द्वारे पाचवा “भव्य आंबा महोत्सव: २०२६ आंबा प्रदर्शनी व विक्री”, कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणा येथे दि. १४ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आला  होता. या महोत्सवाचे अध्यक्षपद  सन्माननीय कुलगुरू  ,डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ,अकोला मा.डॉ.शरद गडाख यांनी भूषवले. सदर महोत्सवामध्ये मुख्य अतिथी म्हणून संचालक,विस्तार शिक्षण,डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला मा.डॉ.धनराज उंदिरवाडे यांनी उपस्थित राहून महोत्सवाची शोभा वाढविली.त्याचप्रमाणे प्रमुख, फुलशास्त्र विभाग,  पं.दे.कृ.वि.अकोला डॉ.नितीन गुप्ता यांनी महोत्सवाला आपली विशेष उपस्थिती नोंदविली. तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, श्री. संतोष डाबरे, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. अमोल झापे आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.

            यावेळी, महोत्सवाचे प्रास्ताविकपर भाषण कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. अमोल झापे यांनी केले. त्यांनी स्थानिक आंब्यांच्या जातींचे संवर्धन कसे करता येईल याबद्दल माहिती दिली.

            महोत्सवाचे अध्यक्ष सन्माननीय कुलगुरू ,डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ,अकोला मा.डॉ.शरद गडाख यांनी हरितक्रांती योजनेवर प्रकाश टाकत एकात्मित शेतीच्या नियोजनाचे महत्व शेतकऱ्यांना पटवून सांगितले.

            मंचावर उपस्थित मुख्य अतिथी म्हणून संचालक,विस्तार शिक्षण,डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला मा.डॉ.धनराज उंदिरवाडे यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न व उत्पादन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कसे वाढवता येईल हे पटवून दिले.

            शेतकरी बांधव अवचितराव कालकर व विठ्ठलभाऊ परिहार यांनी महोत्सवासंबंदी  आपले मनोगत व्यक्त केले.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनिल तारू यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता मंचाचे सर्व सदस्य, कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणा आणि कृषि संशोधन केंद्र, बुलढाणा च्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केलेत.

              कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. महोत्सवात विविध प्रकारच्या आंब्यांच्या दालानांवर  नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

                   या प्रसंगी अनेक शेतकरी, नागरिक व शहरातील आंबा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.