कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणा, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व श्री. व्ही. बी. कोटेचा पाणी वापर संस्था अभिकरण, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणा येथे नैसर्गिक शेती पद्धतीवर आधारित शेती दिन व जिल्हास्तरीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम दि.१६.०९.२०२६ रोजी उत्साहात पार पडला. कार्यक्रमास जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणा येथे एक एकर क्षेत्रावर नैसर्गिक शेती पद्धतीवर आधारित प्रात्यक्षिक प्लॉट विकसित करण्यात आला आहे. तसेच नैसर्गिक शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध निविष्ठा तयार करण्यासाठी दालनाची स्थापना करण्यात आली आहे. या प्रात्यक्षिक प्लॉटची शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करून विविध नैसर्गिक निविष्ठा तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे कार्यालय प्रमुख डॉ. अमोल झापे यांनी नैसर्गिक शेतीतील भविष्यातील संधी व आव्हाने याबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. अनिल तारू,शास्त्रज्ञ कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणा यांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व, फायदे तसेच विविध निविष्ठांची निर्मिती व वापर याबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमास डॉ. जगदीश वाडकर, डॉ. सुकेशनी वाने, कु. कृतिका गांगडे, श्री. दिपक चौमवाल, श्री. सोमनाथ गवते, श्री. रंजित सदार, श्री. अनिल जाधव, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष श्री. मोहन जगताप, श्री. प्रकाश सपकाळ तसेच श्री. व्ही. बी. कोटेचा पाणी वापर संस्था अभिकरण, पुणे यांचे श्री. वैभव अमिलकांतवार यांची उपस्थिती होती.
नैसर्गिक शेतीच्या प्रात्यक्षिकामुळे शेतकऱ्यांना या पद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला असून, शाश्वत व पर्यावरणपूरक शेतीला चालना देण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरला.कार्याक्रमचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन डॉ. अनिल तारू यांनी केले.



