सामूहिक तेलबिया पीक प्रात्यक्षिकांतर्गत शेतकरी प्रशिक्षण संपन्न (०६.०८.२०२६)

सामूहिक तेलबिया पीक प्रात्यक्षिकांतर्गत शेतकरी प्रशिक्षण व शेती शाळा संपन्न

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम २०२६ अंतर्गत सामूहिक तेलबिया पीक प्रात्यक्षिक, शेतकरी प्रशिक्षण, चर्चासत्र तसेच प्रक्षेत्र भेटीचे आयोजन नागापूर (ता. मेहकर) येथे करण्यात आले. याच कार्यक्रमाअंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत शेती शाळेचा तिसरा वर्गही यशस्वीरित्या पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्र, बुलढाण्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. अमोल झापे हे होते. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन करताना केवळ उत्पादनवाढीवर नव्हे तर मृदा आरोग्य सुधारण्यावरही भर देण्याचे आवाहन केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी विकसित केलेल्या जैविक निविष्ठांचा शास्त्रोक्त वापर केल्यास जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते तसेच उत्पादनक्षमतेत वाढ होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या विविध पीकविषयक शंकांचे समाधान करून त्यांनी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन केले.

यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्री. राजूरकर, उपकृषी अधिकारी श्री. धांडे, सहाय्यक कृषी अधिकारी सौ. जंजाळ, तंत्र अधिकारी श्री. विजय सरोदे तसेच समूह सहाय्यक श्री. अजय खराटे यांनी तेलबिया पिकांचे व्यवस्थापन, पीक संरक्षण व शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला नागापूरच्या सरपंच सौ. कल्पनाबाई समाधान गायकवाड, कृषी सखी सौ. चैताली धाबे, महिला बचत गटांच्या सदस्यांसह प्रगतिशील शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.

कृषी विज्ञान केंद्र, बुलढाण्याचे विषय विशेषज्ञ डॉ. वाडकर यांनी सामूहिक पीक प्रात्यक्षिकाच्या उद्दिष्टांविषयी माहिती देताना गावस्तरावर पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. सामूहिक पद्धतीने आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादनवाढीसह खर्चात बचत आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन साध्य होण्यास मदत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत आयोजित शेती शाळेच्या तिसऱ्या वर्गामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन पिकातील मर रोगचक्रीभुंगा या प्रमुख कीड-रोगांचे व्यवस्थापन, त्यांची ओळख आणि नियंत्रण उपाययोजनांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. पिकांची नियमित पाहणी करून आर्थिक नुकसान पातळी लक्षात घेऊनच आवश्यकतेनुसार कीडनियंत्रण उपाययोजना व फवारणी करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच प्रत्यक्ष शेतामध्ये पीक निरीक्षणाची पद्धतही शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आली. कार्यक्रमादरम्यान कृषी शास्त्रज्ञ व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रांना भेट देऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली व उद्भवलेल्या समस्यांवर शास्त्रोक्त उपाय सुचविले. उपस्थित शेतकऱ्यांनी या प्रत्यक्ष मार्गदर्शनाचा लाभ घेत विविध शंकांचे निरसन करून घेतले.

कार्यक्रमास श्री. गणेश धाबे, श्री. पवन धाबे, श्री. सुधाकर धाबे, श्री. विलास धाबे, श्री. नंद गायकवाड, श्री. समाधान गायकवाड, श्री. नंदकिशोर किल्लारी, श्री. इलियास खान यांच्यासह नागापूर गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा तसेच गावातील शेतकरी बांधवांनी मोलाचे सहकार्य केले.

Author: kvk-buldhana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *